…आणि अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

मी राजेश , अट्टल बेवडा , परमेश्वराच्या क्रुपेने आणि ए .ए .च्या मदतीने आज मद्यमुक्त आहे, आणि एक चांगले जीवन जगत आहे .

१९८४ साली त्या बियर ने चांगलाच आनंद दिलेला होता, पण हीच दारू माझ्या जीवनात एवढे मोठे वादळ निर्माण करेल असे, स्वप्नात देखील वाटले नव्हते. एक वेळ अशी आली की सकाळी ५:३० वाजता हातभट्टीची दारू प्यायला सुरवात झालेली होती.  दारू शिवाय काहीच सुचत नव्हत.  मी आणि दारू या शिवाय माझे जगच उरलेले नव्हते.  माझ्या संपूर्ण  जीवनाचा  ताबा दारुने घेतला होता.

संगत आणि संस्कार माणसाच्या आयुष्यात निर्णायक ठरतात. आई वडिलांनी माझी दारू सुटावि म्हणून अनेक प्रयत्न केले, पण यश आले नाही. सरते शेवटी नाईलाजाने मला घरातून हाकलून दिले, आणि मग रोड वरचे भयाण जीवन वाट्याला आले.

सुरवातीला अंगात ताकद होती तो पर्यंत, जिथे जिथे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची कामे होती तिथे जाऊन सेक्यूरिटीचे काम केले. उपनगरात या निमित्ताने बराच भटकलो. पण कुठेही दारुने पाच सहा महिन्याच्या वर टिकुच दिले नाही. जिथे नोकरी करायचो तिथेच राहायचे, हातभट्टीच्या अड्ड्यावर जाऊन दारू ढोसायचो. हळू हळू जेवण कमी होत गेले, अशक्तपणा वाढत होता, हाता पायाला कंप सुटायचा, सकाळी दारू पिऊनच ड्यूटीवर उभा राहत असे. नंतर नंतर सेक्यूरिटीचे १२ तासाचे कामच होईना. मग माझ्या विभागात आलो. रात्री कुठेही झोपायचो, ऑटोरिक्षात, देवळाच्या उंबरठ्यांवर, दुकानाच्या मोकळ्या जागेत. लूत  लागलेल्या कुत्र्याप्रमाणे माझी अवस्था झालेली होती.

आई , वडील , मोठा भाऊ यांच्या बद्दल प्रचंड खुन्नस वाढत होती आणि त्या रागातच एके दिवशी वडिलांच्या बालपणीच्या मित्राकडे गेलो आणि त्यांना सांगितले, वडील वारलेत, मैताला आणि कार्याला पैसे द्या. त्या सद्ग्रहस्ताने एवढे देखील विचारले बॉडी कधी उचलणार आणि मी निर्लज्जपणे सांगितले, संध्याकाळी चार वाजता या. पश्यातापाची भावना त्यावेळी  माझ्या मनात अजिबात नव्हती. सारासार विचार करण्याची क्षमता देखील दारुने हीरावली होती.

अहंकार हा माझा नेहमीच स्तायीभाव राहिला आहे. आदर्श मित्र, समाजातील चांगली लोक जेव्हा मला समजावयाचे त्या वेळी मी त्यांना बोलायचो, “घेतली घेतली म्हणजे किती घेतली, सारी धन दौलत तर नाही ना उधळली, पिणाऱ्यानच्या  महिफिलीत माझ्या सारख्या सम्राटानि नाही प्यायची  तर काय काशीच्या देवळात घंटा हलवण्याऱ्या ब्राम्हणांनी प्यायची”. एक एक करून मित्र दुरावला. शेवटी एकटेपणाच्या गर्तेत होतो. भटारखाण्यात जेवायला जायचो. कित्येक दिवस अंगाला पाणी लागलेले नसायचे. बऱ्याच वेळेला दारूला पैसे कमी पडतील म्हणून सुलभ शौचालयाला द्यायला एक रुपया नसायचा. दारुने आणलेली भीषण अवस्था होती. मग प्रातर्वीधीसाठी रेल्वे रुळाच्या बाजूला जायचो.

माझी आई तीन मेजर ऑपरेशनची बाई, पण तिच्याबद्दल देखील साधी सहानभूतीं नव्हती आणि त्यात ती कर्क राशीची. एका राशीचक्राच्या कार्यक्रमात ऐकले होते की कर्क राशीचे स्त्री असोत  वा पुरुष, एखाद्या उदबत्ती प्रमाणे जळतात आणि दुसऱ्याला सुवास देतात. पण दारूने माझ्या मेंदूवर संपुर्णतया ताबा घेतला होता आणि मी विवेक हरवून बसलो.

२९ ऑक्टोबर १९९९ ला ए .ए .चा मेसेज मिळाला, तिथपासून आज तागायत दारू थांबलेली आहे.

ए .ए .मधे आलो आणि कळले, संपूर्ण पराभव कबूल केल्याशिवाय जीवनात विजयाची सुरवात नाही होत. सुरवातीला ए .ए .चे साहित्य हातात आलेले नव्हते, पण एक पुस्तक जे किरण बेदी यांचे होते, “इट्स औल्वेज पॉसिबल” ते वाचायला मिळाले. त्यांच्या प्रस्थावनेत त्यांनी लिहले होते, तिहार जेल अधीक्षकां हे मला मिळालेले प्रमोशन नव्हते तर मला मिळालेली पनिशमेन्ट होती. ते  पुस्तक वाचत असतांना एका वाक्यावर माझी नजर पडली त्यात लिहले होते,  “माणसाने आपले आयुष्य चार्ज केले नाही तर काळ त्याच्यावर लाठीचार्ज करील“, आणि ए .ए .च्या सुरवातीला हे वाक्य माझ्या करिता टर्निंग पॉईंट ठरले.

मी विचार केला निर्ढावलेले गुन्हेगार तिहार जेल मधे राहून, आध्यात्मिक मार्गात येऊन जर सुधारू शकतात तर ए .ए .मधे जाऊन राजेश तू चांगले जीवन जगू शकतोस. काही कालावधीनंतर मार्गदर्शक घेतला त्यांनी ए .ए .च्या साहित्याची ओळख करून दिली. १२ पायऱ्यानचा कार्यक्रम समजाऊन सांगितला.

एक गोष्ट मला आज नक्कीच कळलेली आहे. माझ्या कडे क्रूतज्ञता असेल तरच आणि तरच मी माझ्या अहंकाराला खीळ घालू शकतो. आज विनम्रता आहे त्याचबरोबर जबाबदारिची जाणीव आहे. आज मद्यमुक्त जीवनात जे काही थोडे फार यश मिळाले आहे त्याचा कर्ताकरवीता मला समजलेला परमेश्वर आहे. आज असे कुठलेही मी काम करीत नाही ज्याची उद्या मला लाज वाटेल. सोबरायटीमधे लग्न झाले. इथे देखील सत्याचा आधार घेतला. मी पूर्वआश्रमीचा बेवडा, नवीन नोकरी, सांगाव लागल. एकुलती एक मुलगी आहे, १२वी ची परीक्षा दिलेली आहे, १५ जुलै २०२० ला रिजल्ट आहे.

आजही काही उणीवा आहेत त्यावर ए .ए .च्या माध्यमातून काम करतोय.

 

आपला

राजेश .पी.

ए .ए .नई रोशनी समूह.

——————–

सूचना

आपल्याला जर स्वता:चा अनुभव अमुच्या संकेतस्थळावर प्रकाशित करावयाची इच्छा असल्यास आपण आपुला लिखित अनुभव आम्हाला इमेल द्वारे [webmaster@aawmig.org] अथवा व्यतिशरित्या अे.अे. पशिम मुंबई अंतर समूह कार्यालयात पोचता करावा.

अे.अे. सभासद आपुला अनुभव मराठी, हिंदी अथवा ईंग्रजी भाषेत अमुच्या संकेतस्थळावर प्रकाशित करू शकतात.

You may also like...